Friday, April 2, 2010

आत्मानंदमग्न व्योम

आत्मानंदमग्न व्योम
आता उठावे पंख घेवुनी
वेगे भेदावे उंच गगनाला
सुर्यामागे जाउनी लपुन राहावे
लागावा ना मागमूस कुणाला !

भले बेहत्तर राख जाहली
परत फिरुनी यावे धरणीवर
कण कण होवुनी तरंगावे
रानोमाळी बागडणा-या वा-यावर !

स्वप्नात जावूनी वेचावे मोती
भले जागेपणी हाती पत्थर
पत्थारातुनी लेणी कोरीव उठवू
असेल नशीब जरका बलवत्तर !

वेचुनी काटे काढुनी जर
विणावे कलाबुती वस्त्र जरतारी
गोळा करुनी आनंदाचे गाठोडे
फिरावे भूतली सुख सौदागरापरी !

हसतील शहाणे म्हणतील वेडा
तमा कशास कुणाची बाळगावी
दुख मिळाले जरी अपरंपार
बिरुदे म्हणुनी शिरी वागवावी !

फोडुनी खडक उठवाव्या वाटा
पिऊनी सागरा अगस्ती बनावे
जळूनी गेली कुडी तरीही
आत्मानंदात व्योमी उत्तुंग विहरावे !

विजयकुमार.........
२६.०२.२०१०,मुंबई

Saturday, January 2, 2010

आग

आग

काळोख असा पसरला
भय दाटले उरी
करिती खेळ आधांतरी
दोरीवर कोल्हट्याच्य पोरी


कुठे जाहले प्रेत
जमले लोक सात
बघे चार खांदेकरी
तीन रडती माघारी


पोरे मंडिती डाव
मुखी प्रौढतेचा भाव
उसन्या आवसानाचा आव
चारी दिशा, मिळेना ठाव


आठ दिशांचे जग
कसा काढणार माग
कोळसे भिजती पावसात
पसरली शरीरात आग


विजयकुमार................
आभाळाउर

आता पश्चाताप व्यर्थ
घडणारे घडुनी गेले
प्राक्तनाचे काटेरी मुकुट
शिरी आता राहिले


अंधारात विरली वाट
डोळ्यांच्या विझल्या ज्योती
कनकाच्या मोहापायी
हाती आली माती


अगम्य होते ते
ज्याचा ध्यास धरला
विचारांच्या जंजाळात
एकटा सहवास उरला


कुठे करावे आता
जखमी मन मोकळे
अघोरी स्वप्नांच्या भयाने
नीज सैरावैरा पळे


बंद जाहल्या वाटा
आता मुक्ती अशक्य
एकाकी आयुष्यात उरले
जहरी जगण्याचे अतर्क्य


अंधारात दिसावा किरण
शरीराची व्हावी माती
फुटुनी आभाळाचे उर
चांदणे पडावे भोवती


विजयकुमार........
१९.०९.२००९,मुंबई

Tuesday, December 29, 2009

भर वैशाखातला कृष्णमेघ
चांदण्या मोजून सुध्दा हिवाळ्यातल्या
वैराणरात्री सरत नाहीत,
मग दिवस मोजून
आक्रसणारे आयुष्य कसे काय
थांबवणार ?
अमावस्येकडे वळणा-या चंद्रासारखा
चेहरा निस्तेज पडत जातो
मग हूरहूर उरते ती
खोल गर्तेकडे घेवून जाणा-या
अवकाशव्यापी अंताची.
आक्रमक कैफांच्या भुकंपानी
हादरणा-या माड्या एक एक
करत कोसळत जातात
अन
भूसभूशीत जिने पाय
मातकट करत
सा-या जगण्याची धूळदान
करतात,
उरते ते एक धूळट भावना
प्रत्येक सकाळी येणा-या
शिळ्या सूर्यप्रकाशावर
तरंगणारी.
प्रखर उन्हाळ्यात वितळणा-या हिमासारखे
वजन घटत जाते,
त्याचे तनग्रासी भय वजनकाटा
थरथरत दाखवत असतो
मग आरश्यात रोज बदललेला
नवा चेहरा दिसतो,
आयुष्य व्यापणा-या
काळ्याकुट्ट ढगांची वर्तुळे
डोळ्याभोवती रासलीलांचा फेर
धरतात
तेव्हा वैशाखातल्या कृष्णमेघासारखे
एकटे एकटे वाटते.
जीवनरस शोषून सारं
वैफल्यग्रस्त जगणं
हाडांचा सांगाडा करतं
मग हौसेने घेतलेले वासने
शरीरावर,
बुजगावण्यावर पांघरल्या सारखी
वाटतात,
मग Ray Ban चा गॉगल चढवून
बाहेर पडायचं,
कुणालाही न बघता,
बघणारे मात्र सारा बदल टिपत
"टिप्पणी ' देत राहतात
अन
टीपकागदासारखं सारं टिपून घेत
मन गडद होतं,
सारं शरीर काळवंडायला लागतं.
पहाट चुकवायची नाही
अन रात्र गमवायची नाही
सारा पाठशिवणीचा खेळ
खेळावाच लागतो
one side ,
हार तर नित्याचीच
टाळता न येण्यासारखी
मग
कधी तरी ती म्हणते
तू पूर्वीसारखा राहिला नाहीस !
तेव्हा मात्र रात्रभर डोळे
पूर्वरंगाची वाट पाहत
निजेला थारा न देता
जागतात.
कधीतरी मधेच रामप्रहरी डोळा
लागतो,
तिच्या चांदीच्या घंटीची किनकिन डोळे
किलकिले करते,
नवा दिवस बघून मन
हायसं होतं
जाळणारा सूर्य
गोठविणा-या रात्रीची आठवण
देत राहतो
अन
आरसा
बदललेला चेहरा दाखवत
क्रूरहास्य पसरवतो
मग मी
पायाखाली विस्कटलेल्या रांगोळी सारखा
पसरत जातो.
विजयकुमार.........
२६.१२.२००९, मुंबई

Thursday, December 10, 2009

मन मावळले गाव

काटा शिरताच थबकली पाउले
कोवळी जाणीव अनवाणी पायास
दूर डोंगरापार धुरलोट उठले
मार्गास लागण्या पडती सायास

कोरडे ओठे सर्पाळ जीभा
मुक्ती दूरस्थ त्राण सरले
सुकले वृक्ष कोवळा गाभा
कोरड्या मातीत बीज पुरले

पदरात माया वस्त्रांची निशाने
कोसळले वासे गवत पसरले
मुक्या मनाचे हृदयी गाणे
तडाग विरुनी कमलदल हलले

बंद राउळे तांडव सभोवाती
उन्हाळ फुफाट्यात तांडे मार्गस्थ
कळपाने सारी सरणे चालती
मेल्या मनाची शरीरे अस्वस्थ

वळसा डोंगराला शरीरे गळतात
वासरांचे रेकणे बैलास फेस
गाभण गाया दुबार चालतात
धुळीच्या लोटात हरवली वेस

विजयकुमार.........

२५.११.२००९, मुंबई