Friday, April 2, 2010

आत्मानंदमग्न व्योम

आत्मानंदमग्न व्योम
आता उठावे पंख घेवुनी
वेगे भेदावे उंच गगनाला
सुर्यामागे जाउनी लपुन राहावे
लागावा ना मागमूस कुणाला !

भले बेहत्तर राख जाहली
परत फिरुनी यावे धरणीवर
कण कण होवुनी तरंगावे
रानोमाळी बागडणा-या वा-यावर !

स्वप्नात जावूनी वेचावे मोती
भले जागेपणी हाती पत्थर
पत्थारातुनी लेणी कोरीव उठवू
असेल नशीब जरका बलवत्तर !

वेचुनी काटे काढुनी जर
विणावे कलाबुती वस्त्र जरतारी
गोळा करुनी आनंदाचे गाठोडे
फिरावे भूतली सुख सौदागरापरी !

हसतील शहाणे म्हणतील वेडा
तमा कशास कुणाची बाळगावी
दुख मिळाले जरी अपरंपार
बिरुदे म्हणुनी शिरी वागवावी !

फोडुनी खडक उठवाव्या वाटा
पिऊनी सागरा अगस्ती बनावे
जळूनी गेली कुडी तरीही
आत्मानंदात व्योमी उत्तुंग विहरावे !

विजयकुमार.........
२६.०२.२०१०,मुंबई

No comments:

Post a Comment